राजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचत सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. एका क्षणाला पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटत असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांनिशी ५३ धावा केल्या. सुरुवातील संथ धावगती असणाऱ्या तेवतियाने १८ व्या षटकात सामना पालटला. तेवतियाच्या या खेळीचे सोशल नेटवर्किंगवर भरभरुन कौतुक केल जात आहे. मात्र त्याचबरोबरच सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे ती केरळचा युवा यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनची. चेन्नई आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यात संजूने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पंजाबविरुद्ध सामन्यात राजस्थानला २२४ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. डोंगराएवढं आव्हान राजस्थानने स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.

संजूने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत संजूने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याची ही खेळी पाहून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनाही त्याचे कौतुक केलं आहे. त्यांनाही ट्विटवरुन संजूबद्दल एक प्रश्न विचारला आहे. सॅमसन नावाचा सभ्य गृहस्थ नक्की जेवणात काय खातो यासंदर्भातील माहिती मला कोणी देऊ शकेल का?, असा प्रश्न महिंद्रा यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

या सामन्याच्या अगदीच अनपेक्षित निकालानंतरही महिंद्रांनी ट्विट करुन या सामन्यातून सर्वांना बरंच काही शिकण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे. “आज ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहिला आहे त्यांना लाखो लोकं आयपीएल का पाहतात हे समजलं असेल. आयुष्यभर उपयोगी पडतील असे धडे येथे मिळतात. कधीच हार मानू नका. कधीच एखादं काम अर्ध्यात सोडून का. काहीही घडू शकतं यावर विश्वास ठेवा. अमर्याद शक्यतांचा विचार करा. आठवडा सुरुवात करण्यासाठी हे धडे उत्तम आहेत,” असं महिंद्रांनी म्हटलं आहे.

सातत्याने चांगली खेळी करुनही भारतीय संघात संधी मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संजू सॅमसनला पाठींबा वाढतो आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत असताना संजूच्या फलंदाजीतही लक्षणीय फरक पडला आहे. पूर्वीपेक्षा त्याची फटकेबाजी अधिक चांगली झालेली आहे.

“गेल्या वर्षभरापासून माझी फलंदाजी सुधारली आहे, फटके आता चांगल्या पद्धतीने खेळले जात आहेत. त्यामुळे मी माझा नेहमीचा सराव सुरु ठेवतोय आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरतोय. संघाच्या विजयात माझा मोलाचा सहभाग आहे हे पाहून मला खरंच आनंद होतोय. काही वर्षापूर्वी मी काही गोष्टींसाठी खूप मेहनत घेत होतो…पण काहीच मनासारखं घडत नव्हतं. अनेकदा खुप नैराश्य आल्यानंतर मी आत्मपरीक्षण केलं आणि मग गोष्टी थोड्याफार प्रमाणात सुकर व्हायला लागल्या. मला नेमकं काय साध्य करायचं आहे हा प्रश्न मी मलाच विचारला. अजुन पुढची १० वर्ष मी याच तडफेने खेळू शकतो आणि ती १० वर्ष मला असाच खेळ करायचा आहे.” पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना संजूने आपल्या फलंदाजीचं गुपित सांगितलं.