इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.

वडील कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे स्टोक्स जवळपास अर्ध्या स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत, तर बटलरने स्वतंत्र प्रवास केल्यामुळे ३६ तासांच्या विलगीकरणानंतरच त्याला स्पर्धेत खेळता येईल. याचप्रमाणे स्मिथ इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून सावरत असून, त्यामुळे राजस्थानच्या संघाचा समतोल बिघडला आहे.

राजस्थानचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न मातब्बर परदेशी खेळाडूंच्या आगमनावर अवलंबून आहे. सध्या तरी राजस्थानची मदार जोफ्रो आर्चर आणि अ‍ॅन्ड्रय़ू टाय या वेगवान गोलंदाजांसह आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांच्यावर आहे. राजस्थानच्या देशी खेळाडूंना कामगिरी उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट आणि वरुण आरोन गेली अनेक वर्षे अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत.

दुसरीकडे चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध शनिवारी पाच गडी राखून विजय मिळवत आपले ‘आयपीएल’मधील खाते उघडले आहे. या सामन्यात सॅम करनने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले होते. त्यामुळे ड्वेन ब्राव्होला दुखापतीतून सावरण्यास उशीर लागला, तरी चेन्नईला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. अंबाती रायुडू, फॅफ डय़ू प्लेसिस यांनी आक्रमक फलंदाजी करीत धावांचा पाठलाग करण्यात मोलाचा वाटा उचलला.

अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावलामुळे चेन्नईचा मारा अधिक सशक्त भासतो आहे. मागील सामन्यात वेगवान गोलंदाज दीपक चहरला झालेली दुखापत गंभीर असल्यास शार्दूल ठाकू रला खेळण्याची संधी मिळू शकेल.

अश्विन दुसऱ्या लढतीसाठी उपलब्ध

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला झालेली दुखापत फारशी गंभीर नसून दुसऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, असे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले; परंतु याबाबत अंतिम निर्णय संघाचे फिजिओ आणि व्यवस्थापन घेईल, असेही तो म्हणाला. अश्विनने पंजाबविरुद्धच्या लढतीत वैयक्तिक पहिल्या षटकातच दोन बळी मिळवले होते.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १