प्रशांत केणी

वयस्क खेळाडूंचा अतिभरणा असल्याने ‘डॅडी आर्मी’ने अनुभवाच्या बळावर इंडियन प्रीमियर लीगवर (आयपीएल) अधिराज्य गाजवले; पण महेंद्रसिंह धोनीची कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत असताना चेन्नई सुपर किंग्जची रयासुद्धा हरपत चालली आहे. ‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वी बसलेले हादरे, महत्त्वाच्या खेळाडूंची माघार, धोनीसह अनेक खेळाडूंची मैदानावरील झगडणारी कामगिरी यामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले असून, आता हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.

भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार असे बिरुद मिरवणाऱ्या धोनीवर १२ वर्षांपूर्वी एन. श्रीनिवासन यांनी चेन्नईच्या नेतृत्वपदासाठी विश्वास टाकला. तो धोनीने तीन ‘आयपीएल’ आणि दोन चॅम्पियन्स लीग जेतेपदे पटकावून सार्थही ठरवला. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक ६१.२८ विजयाची टक्केवारी राखून यशोगाथा बनलेल्या चेन्नईच्या यशातील धोनीचा सिंहाचा वाटा कुणीच नाकारू शकणार नाही; पण चाळिशीकडे झुकलेल्या आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या धोनीची जादू आता संपत चालली आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात सामन्याचा निकाल पालटण्याची क्षमता, त्यासाठी मैदानावर हुकमत गाजवणारी फलंदाजी, बुद्धिबळाच्या चालींप्रमाणे मैदानावर आखलेली रणनीती, ही त्याची बलस्थाने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये क्वचितच पाहायला मिळाली. ११ सामन्यांत २५.७१च्या सरासरीने १८० धावा ही त्याची कामगिरी संघाच्या यशाला प्रेरणादायी मुळीच नव्हती. धोनीशिवाय चेन्नई या कल्पनेपलीकडील विचारधारेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून संघ व्यवस्थापन पाहू शके ल का?

करोनाच्या साथीचे आव्हान पेलत ‘आयपीएल’ सुरू होण्याआधीच सुरेश रैना, हरभजन सिंग यांनी तांत्रिक कारणे देत माघार घेतली. संयुक्त अरब अमिरातीत दाखल होताच चेन्नईच्या पथकातील १४ जणांना करोनाची लागण झाली. या धक्क्यातून सावरत ‘आयपीएल’ हंगामाचा दिमाखात प्रारंभ करणाऱ्या चेन्नईला नंतर आपला रुबाब दाखवता आला नाही. सट्टेबाजीचा फटका बसल्याने २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईवर बंदी घालण्यात आली; पण २०१८ मध्ये त्यांनी विजेतेपदासह झोकात पुनरागमन साजरे के ले. मागील वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना भविष्यातील वादळाची कल्पना होती. त्यांनी गतवर्षीच नव्या खेळाडूंसह संघबांधणी करण्याबाबत सूचना के ली होती; पण संघ व्यवस्थापनाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. यंदा ११ सामन्यांपैकी फक्त तीन विजय आणि २७.२७ टक्के  विजयाची टक्के वारी हे चेन्नईच्या रुबाबाला साजेसे मुळीच नाही.

चेन्नईच्या जहाजाला अनेक छिद्रे पडली आहेत, ही वस्तुस्थिती धोनीनेही मान्य के ली आहे. ३६ वर्षांचा फॅ फ डय़ू प्लेसिस आणि २२ वर्षांचा अष्टपैलू इंग्लिश खेळाडू सॅम करन वगळता चेन्नईच्या कामगिरीत

कु ठेच सकारात्मकता नाही. ३९ वर्षांच्या शेन वॉटसनने एखाददुसऱ्या सामन्यात विजयवीराची भूमिका साकारली; पण फलंदाजीत सातत्य न उरल्याने त्याच्या विसंबून राहणे धोकादायक ठरले. त्याच्या गोलंदाजीची धारसुद्धा आता बोथट झाली आहे. पस्तिशीच्या के दार जाधवने आठ सामन्यांत फक्त ६२ धावा के ल्या आहेत, तर पीयूष चावलाने सात सामन्यांत जेमतेम सहा बळी मिळवले आहेत. अपेक्षित कामगिरी करू न शकणारे जाधव आणि चावला संघात कशासाठी? हा सवाल माजी क्रि के टपटू कृ ष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासह अनेकांना पडला आहे. धोनीच्या प्रक्रि यात्मक विचारधारेवरही श्रीकांत यांनी तोफ डागली.

४२ वर्षांच्या इम्रान ताहिरने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एकमेव सामन्यात खेळताना तीन षटकांत २२ धावा दिल्या, परंतु त्याला एकही बळीचे खातेसुद्धा उघडता आलेले नाही. पस्तिशीचा अंबाती रायुडू मिळालेल्या संधीचे सोने करीत धावांचे सातत्य राखतो आहे. ३७ वर्षांच्या ड्वेन ब्राव्होची कामगिरीसुद्धा निराशाजनक आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेणाऱ्या ब्राव्होने सहा सामन्यांत सात धावा के ल्या आहेत, तर सहा बळी घेतले आहेत; परंतु पुढील वर्षी नव्याने संघबांधणी झाल्यास या सर्वाची स्थाने डळमळीत असतील. रवींद्र जडेजाची कामगिरी त्या तुलनेत समाधानकारक आहे.

चेन्नईचा संघ क्षमतेनुरूप कामगिरी करू शकला नाही, हे सत्य धोनीने स्वीकारले आहे; पण आता उर्वरित तीन सामने आणि पुढील हंगामाचा विचार करून नव्याने संघबांधणी करण्याविषयी संघ व्यवस्थापन कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरेल. ७३२ कोटी रुपये मूल्यांकन असलेल्या चेन्नईच्या संघाला वयस्क खेळाडूंचे धोरण बदलून नवी विचारधारा स्वीकारावी लागणार आहे. भावनिकदृष्टय़ा कठीण असलेले हे आव्हान मानसिकदृष्टय़ा स्वीकारले, तरच पुढील वर्षी घसरलेली चेन्नई एक्स्प्रेस पुन्हा रूळावर येऊ शकेल.

prashant.keni@expressindia.com