Dream11 IPL 2020 KKR vs SRH: सलामीच्या सामन्यात पराभव पत्करलेल्या दोन संघांमध्ये IPLमधील शनिवारचा सामना रंगला. कोलकाताविरूद्धच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती पण वॉर्नर हा फलंदाजी स्वीकारणारा पहिला कर्णधार ठरला. या सामन्यातील जॉनी बेअरस्टोची विकेट खूपच नाट्यमय ठरली.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो दोघे मैदानात आले. अतिशय सावधपणे खेळ करत त्यांनी खेळपट्टीवर जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या षटकात अखेर बेअरस्टोला माघारी परतावे लागले. पॅट कमिन्सने षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेअरस्टोला गुड लेंग्थ चेंडू टाकला. तो चेंडू खेळताना बेअरस्टो चक्रावला आणि चेंडू मांडीला लागून उडाला. दिनेश कार्तिकने झेल टिपला आणि पंचांनी त्याला बाददेखील ठरवले पण DRSमध्ये तो नाबाद असल्याचे निष्पन्न झालं. या जीवनदानानंतर तो किती धावा करतो याकडे साऱ्यांचं लक्ष होतं पण पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.

सलामीच्या सामन्यात बेअरस्टोने बंगळुरू विरूद्ध शानदार अर्धशतक ठोकलं होतं. ४३ चेंडूत त्याने ६१ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.