फाफ डु-प्लेसिस, अंबाती रायुडू आणि परविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने दिल्लीविरुद्ध सामन्यात १७९ धावांचा पल्ला गाठला. शारजाच्या मैदानावर नाणेफेक जिंकत धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही चेन्नईच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना केला. फाफ डु-प्लेसिसने झळकावलेलं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत रायुडू, जाडेजाने केलेली फटकेबाजी चेन्नईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडत चेन्नईला मोठा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसनसह फाफ डु प्लेसिसने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. डु-प्लेसिसने आक्रमक पवित्रा घेत चांगली फलंदाजी करत दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. पण सामन्याच्या सहाव्या षटकात चेन्नईसाठी एक चिंतेची गोष्ट घडली. रबाडाच्या गोलंदाजीवर धाव घेताना रबाडा आणि डु प्लेसिस यांच्यात जोरदार टक्कर झाली. त्यानंतर काही काळ मैदानावर शांतता होती, पण त्यानंतर दोघांनी हसतहसत पुढे खेळण्यास सुरूवात केली.

पाहा डु प्लेसिस-रबाडामध्ये झालेली भयानक धडक-

अखेरीस नॉर्येने वॉटसनचा त्रिफळा उडवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं. पण डु-प्लेसिसने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. डु प्लेसिसने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.