चेन्नईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नावाप्रमाणेच रॉयल विजय मिळवत आपले स्पर्धेतील आव्हाना जिवंत ठेवले. चेन्नईच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत अत्यंत सुमार कामगिरी केली होती. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे CSKला २० षटकांत ६ बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. १२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने ३ गडी लवकर गमावले, पण जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्यात १७व्या षटकात एक मजेशीर गोष्ट घडली. पियुष चावलाने षटकाचा शेवटचा चेंडू स्टीव्ह स्मिथला टाकला. चेंडू स्मिथला फारसा समजला नाही. चेंडू बॅटला लागून स्टंपच्या जवळ गेला आणि पुन्हा स्मिथच्या बाजूला आला. त्यावेळी धोनी चेंडू पकडण्यासाठी येत असताना स्मिथने फुटबॉल खेळल्याप्रमाणे तो चेंडू धोनीला दिला. सामान्यत: फलंदाज चेंडू बॅटने थांबवतात आणि मग हाताने उचलून फिल्डरला परत करतात. पण स्मिथने चेंडू थांबवला आणि क्षणार्धात बॅट आणि पायाने चेंडू धोनीकडे दिला.

पाहा हा मजेशीर व्हिडीओ-

राजस्थानचा सहज विजय

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर आणि शेन वॉटसन ८ धावांवर बाद झाला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. रायडूही (१३) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. धोनीने २८ धावा केल्या. अखेरीस रविंद्र जाडेजाने (३५*) फटकेबाजी करत संघाला १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

१२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. बेन स्टोक्स १९ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रॉबिन उथप्पा (४) आणि संजू सॅमसन (०) दोघेही झटपट बाद झाले. त्यानंतर जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन अनुभवी खेळाडूंना खेळपट्टीचा अंदाज घेत सावध खेळ केला. ७८ चेंडूत नाबाद ९८ धावांची भागीदारी करत बटलर (७०*) आणि कर्णधार स्मिथने (२४*) सामना जिंकला.