Dream11 IPL 2020 UAE : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९५ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. कोलकातापुढे विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य आहे.

मुंबईच्या डावात हार्दिक पांड्याची विकेट चर्चेचा विषय ठरला. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असणारा हार्दिक पांड्या ‘हिट विकेट’ झाला. आंद्रे रसलने त्याला ऑफ साईडला टाकलेला चेंडू त्याला मारावासा वाटला पण त्याने चेंडू सोडून दिला. पण त्याच वेळी त्याची स्वत:ची बॅट स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या.

दरम्यान, पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सौरभ तिवारी या सामन्यात लवकर झेलबाद झाला. १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत त्याने २१ धावा केल्या. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. ५४ चेंडूंच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली.