कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले. या दोघांनी मोहम्मद शमीचं पहिलं षटक खेळून काढलं. दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या एकाही चेंडूवर राहुल त्रिपाठीला धाव मिळवता आली नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात शमीच्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

त्रिपाठी बाद झाल्यावर नितीश राणा मैदानात आला. तो आणि शुबमन गिल चांगली भागीदारी करणार असं वाटत असतानाच मैदानात प्रचंड गोंधळ दिसून आला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने चेंडूला दिशा दिली आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. समोरून नितीश राणा धावत आला पण गिलने मात्र मन बदलत धाव घेण्यास नकार दिला. फिल्डरने फेकलेला चेंडू स्टंपवर लागला नव्हता, पण दोघेही फलंदाज एकाच दिशेने धावले. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी कोणीच फलंदाज उरला नाही. अशा परिस्थितीत पूरनने अतिशय शांतपणे राणाला धावबाद केलं.

दरम्यान, कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये प्रत्येकी एक-एक बदल करण्यात आला. शेल्डन कॉट्रेल दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी संघात ख्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली. तर कोलकाताच्या संघानेही वेगवान गोलंदाजाला संधी दिली. त्यांनी शिवम मावीच्या जागी प्रसिध कृष्णाला संघात जागा दिली.