दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६०पार मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला १५ धावांनी हार पत्करावी लागली.

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने डाव सावरला. या दोघांनी भागीदारी होत असतानाच कर्णधार अय्यर १७ धावांवर बाद झाला. मग ऋषभ पंतने धवनला साथ दिली. पण धवनदेखील फटकेबाजीच्या नादात ३४ धावांवर माघारी परतला. धवनने राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फटका चुकला आणि यष्टीरक्षक बेअरस्टोने आधी स्टंपिंगसाठी अपील केलं. पण पंचांनी स्टंपिंगचं अपील फेटाळून लावल्यावर बेअरस्टोने लगेच झेल पकडल्याचं अपील केलं आणि वॉर्नरला DRSचा निर्णय घेण्यास भाग पाडले. तिसऱ्या पंचांनी अल्ट्राएजमध्ये चेंडूला बॉल लागल्याचे पाहिले आणि धवन झेलबाद झाल्याचे निष्पन्न झालं.

पाहा व्हिडीओ-

त्यानंतर, शिमरॉन हेटमायरने फटकेबाजीचा प्रयत्न केला परंतु तो १२ चेंडूत २ षटकारांसह २१ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ पंत २८ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सामना दिल्लीच्या हातातून निसटतच गेला आणि हैदराबादने १५ धावांनी विजय मिळवला. राशिद खानने शिखर धवन, कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत हे तीन महत्त्वाचे बळी घेत हैदराबादला स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यास मदत केली.