IPL 2020मध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने आलेल्या KXIP आणि RCB संघाच्या झुंजीत पुन्हा एकदा पंजाबने बाजी मारली. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने बंगळुरूवर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने गोलंदाजांची धुलाई करत दमदार अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी (६१) खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे सामना अतिशय संयमी पद्धतीने पुढे नेत होते. पण जेव्हा मयंक अग्रवाल बाद झाला तेव्हा युनिव्हर्स बॉस गेलचं IPL 2020च्या हंगामात पहिल्यांदा फलंदाजीसाठी आगमन झालं.

ख्रिस गेलने सुरूवातीला अतिशय संथ खेळ करत खेळपट्टीचा अंदाज घेतला. नंतर मात्र त्याने आपल्या ‘सिक्सर किंग’ या उपाधीला स्मरत चौफेर फटकेबाजी केली. त्याने पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तडाखा लगावत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याने त्याच्या बॅटवर असलेला THE BOSS हा स्टीकर कॅमेऱ्याच्या माध्यमातून साऱ्यांना दाखवला. त्याच्या या कृत्यामागे नक्की काय कारण होतं? असा प्रश्न त्याला सामन्यानंतर विचारण्यात आला. त्यावेळी समालोचक सुनील गावसकर यांनी गेलला सांगितलं की तू दाखवलेला स्टीकर हा उलटा होता. ही बाब समजताच गेललाही हसू अनावर झालं.

पाहा तो मजेशीर व्हिडीओ-

पण त्याने प्रश्नाचं थोडक्यात मस्त उत्तर दिलं. “मला फक्त इतकंच दाखवायचं होतं की या नावाची (THE BOSS) जादू अजून संपलेली नाही. त्यामुळे या नावाचा आदर करत राहा.. बास!!”, असं गेल म्हणाला.

सलामीवीर म्हणून ओळख असलेल्या गेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला यावं लागलं. त्याबद्दलही गेलने स्पष्टीकरण दिलं. “खेळपट्टी खूप संथ होती. चेंडू टप्पा पडल्यावर सावकाश बॅटवर येत होता. आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजी करणं थोडं सोपं झालं. संघ व्यवस्थापनाने मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं त्यावर मी लगेच होकार दिला. गेले ७-८ सामने आमचे सलामीवीर चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांची लय तोडण्यात काहीच अर्थ नव्हता. मला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं आणि मी माझं काम फत्ते केलं”, असं गेलने स्पष्ट केलं.