IPL 2020 मधील अतिशय रोमांचक अशा सामन्यात कोलकाताच्या संघाने पंजाबला शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभूत केले. १७ षटकांपर्यंत अतिशय शानदार स्थितीत असणाऱ्या पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपरओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, पण अवघ्या एका इंचाने चेंडू सीमारेषेनजीक पडला आणि पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या. २९ चेंडूत दिनेश कार्तिकने ५८ धावा करत पंजाबला १६५ धावांचे लक्ष्य दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने ७४ धावांची खेळी केली, पण मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा २ धावांनी पराभव झाला. सामना शेवटपर्यंत लांबवण्याचा प्रयत्न पंजाबच्या चांगलाच अंगाशी आला. मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी दमदार शतकी सलामी दिली. याचदरम्यान एक मजेशीर घटना घडली. मयंकने समोरच्या दिशेने एक फटका लगावला. तो चेंडू राहुलच्या दिशेने आला. चेंडू त्याला लागणार असं वाटत असतानाच राहुलने उडी मारून चेंडू चुकवला.

सामन्यात १४व्या षटकात ११५ धावांवर पंजाबने मयंक अग्रवालचा बळी गमावला. त्याने ५६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनला फटकेबाजी करता आली नाही. तो १६ धावांवर बाद झाला. दमदार खेळी करणारा राहुलदेखील १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने ५८ चेंडूत ६ चौकारांसह ७४ धावा केल्या. सामन्यात एका चेंडूत पंजाबला विजयासाठी ७ धावांची तर सुपर ओव्हरसाठी ६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मॅक्सवेलला केवळ चौकार लगावता आला आणि पंजाब पराभूत झाला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या षटकांमध्ये हा निर्णय फसल्यासारखं वाटलं. राहुल त्रिपाठी ४ धावांवर तर नितीश राणा २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल आणि मॉर्गन या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मॉर्गन खेळपट्टीवर स्थिरावला असतानाच झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २ चौकार व १ षटकार खेचत २४ धावा केल्या. मग गिल आणि कर्णधार कार्तिक यांना कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली. याचदरम्यान दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. गिल ५७ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसेलही ५ धावांवर माघारी परतला. कार्तिक मात्र शेवटपर्यंत मैदानात उभा होता. त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, बिश्नोई आणि सिंग यांनी १-१ बळी टिपला.