गतविजेत्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. काही सामन्यांचा अपवाद वगळता संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे आतापर्यंत या संघात फारसे बदल झालेले नाहीत. रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यापासून कायरन पोलार्डने संघाचं नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यात राजस्थान विरूद्ध मुंबईच्या संघाचा सामना सुरू आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने लगावलेला षटकार विशेष चर्चेत राहिला.

मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण क्विंटन डी कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी डाव सावरत ८३ धावांची भागीदारी केली. सामन्यात सहाव्या षटकात अंकित राजपूत गोलंदाजीसाठी आला. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सूर्यकुमारने उत्तुंग असा षटकार लगावला. चेंडू उसळता असल्याने सूर्यकुमारने विचित्र प्रकारे बॅट फिरवली, पण चेंडू हवेत गेला आणि थेट सीमारेषेबाहेर जाऊन पडला.

सू्र्यकुमार आणि इशानने दमदार फलंदाजी केली. त्यांनी ५९ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. इशान किशनने ३६ चेंडूत ३७ धावा केल्या तर सूर्यकुमारने २६ चेंडूत ४० धावा कुटल्या.