मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून मी पूर्णपणे बरा झालो आहे, अशी कबुली सलामीवीर रोहित शर्माने दिली आहे. मुंबई इंडियन्सकडून मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत खेळत रोहितने तंदुरुस्तीवरून होणाऱ्या चर्चाना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

हैदराबादविरुद्धच्या लढतीत रोहित सातच चेंडू खेळून अवघ्या चार धावांवर बाद झाला होता. मात्र दोन आठवडय़ांनंतर त्याचे पुनरागमन झाले होते. मुंबई इंडियन्सकडून चार लढतींना तो मुकला. ‘‘पुनरागमन झाल्याचा आनंद आहे. आयपीएलमध्ये आणखी काही लढती खेळायच्या आहेत. मांडीच्या स्नायू दुखापतीतून आता पूर्णपणे बरा आहे,’’ असे रोहितने म्हटले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेदेखील रोहितने पुनरागमनाची घाई करू नये, असा सल्ला दिला होता.  ‘आयपीएल’मध्ये न खेळण्याचा सल्ला रोहितला गांगुलीने दिला होता. मात्र तरीदेखील रोहितचे हैदराबादविरुद्धच्या लढतीसाठी मुंबई संघात पुनरागमन झाले होते. मांडीच्या दुखापतीच्याच कारणास्तव रोहितची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय संघात निवड झालेली नाही.

दरम्यान, हार्दिक पंडय़ादेखील तंदुरुस्त असल्याची माहिती रोहितने दिली. ‘‘विश्रांतीच्या कारणास्तव हार्दिकला दोन लढतींतून वगळण्यात आले होते. अन्य खेळाडूंना त्यामुळे संधी देता आली,’’ असे रोहितने म्हटले.

बुमरा, बोल्टवर भिस्त

हैदराबादविरुद्धच्या लढतीतून जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती देण्यात आली होती. ‘‘बुमरा आणि बोल्ट हे आमचे मुख्य गोलंदाज आहेत. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या लढतीतून त्यांना विश्रांती देण्यात आली होती. बाद फेरीत चांगली कामगिरी करण्यासाठी ते सज्ज आहेत. दिल्लीचा संघ दर्जेदार आहे. त्यांच्याविरुद्ध बाद फेरीत खेळणे हे आव्हानात्मक आहे,’’ असे रोहितने म्हटले.