दुबईतील क्रिकेटच्या रणांगणावर मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) अंतिम सामना होणार आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच जेतेपद जिंकू इच्छिणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल. मात्र या सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टींगने मुंबईच्या संघाला इशारा दिला आहे. दिल्लीच्या संघाला कमी लेखू नये असं पॉन्टींगने म्हटलं आहे. दिल्लीच्या संघाची सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे असंही पॉन्टींगने म्हटलं आहे. चारवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईच्या संघ हा मैदानात उतरताना पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्लीच्या संघापेक्षा नक्कीच जास्त आत्मविश्वासाने मैदानात उतरले असं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे मागील तीन सामन्यांमध्ये मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला असल्याने दिल्लीच्या संघावर मुंबईपेक्षा अधिक दडपण असेल असंही सांगितलं जात आहे.

पॉन्टींगने सोमवारी अंतिम सामन्याबद्दल बोलताना, या पूर्वीची संघाची कामगिरी पाहिल्यास आम्ही समाधानी आहोत. आम्ही येथे आयपीएलची स्पर्धा जिंकण्यासाठी आलो आहोत आणि अंतिम सामन्यामध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवू असा विश्वास पॉन्टींगने व्यक्त केला.

या स्पर्धेमध्ये दिल्लीच्या संघाने चांगली सुरुवात केल्याचे सांगत पॉन्टींगने श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाचे कौतुक केले. चांगल्या सुरुवातीनंतर आम्ही काहीवेळा अपयशी ठरलो. मुंबईविरुद्धच्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये आम्ही तुलनेने खूपच चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे आम्ही अंतिम सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करु अशी अपेक्षा पॉन्टींगने व्यक्त केली आहे. इथपर्यंत येताना आम्ही किती सामने जिंकलो किती हारलो हे आता फारसं महत्वाचं नाही. प्रत्येक संघ काही सामने जिंकतो काही सामने हारतो मात्र आम्ही इथपर्यंत पोहचले हे महत्वाचे आहे. आमच्या संघाचा सर्वोत्तम खेळ अजून शिल्लक आहे असं मला वाटतंय त्यामुळे या सामन्या चांगली कामगिरी करु असा विश्वास आहे, असंही पॉन्टींग म्हणाला.

अंतिम सामन्याबद्दल बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईचा संघ यापूर्वी अंतिम सामना खेळण्याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आम्हाला मानसिक फायदा अधिक असेल असं म्हटलं होतं. मात्र त्याचवेळी आयपीएलमध्ये प्रत्येक दिवस हा नवी असतो आणि प्रत्येक दिवशी नवीन तणाव असतो त्यामुळेच प्रत्येक सामना हा वेगळा असल्याने आम्ही चांगली कामगिरी करण्यावरच भर देऊ असंही रोहित म्हणाला. “पूर्वी काय झालं याबद्दल तुम्ही जास्त विचार करुन फायदा नसतो,” असंही रोहित म्हणाला.