आयपीएलच्या तेराव्या हंगामात सोमवारी दिल्ली कॅपीटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने आरसीबीला सहा गडी राखून हरवले. या विजयाबरोबरच दिल्लीने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क केलं आहे. तर धावगतीच्या जोरावर आरबीनेही प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात दीडशेपार मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने केलेली फटकेबाजी याच्या बळावर बंगळुरूने ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतरही आरसीबीचा पराभव झाला. मात्र या सामन्यामध्ये पाडीकलच्या फलंदाजीमुळे बंगळुरुला थोडा दिलासा मिळाला हे नक्की.

एनरिक नॉर्येने ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला वेळीचा आवर घातला, पण देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याचे हे यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये पाच अर्धशतकं करणारा देवदत्त हा पहिला खेळाडू ठरला आहे. आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये देवदत्तने हा पराक्रम केला आहे. देवदत्त हा अनकॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेला खेळाडू आहे.

देवदत्तच्या कामगिरीमुळे विराटला मोठा दिलासा मिळाला आहे. देवदत्त हा मागील वर्षीही आयपीएलच्या बाराव्या हंगामामध्ये आरसीबीच्या संघाचा भाग होता. मात्र त्यावेळी विराटने देवदत्तवर फारसा विश्वास दाखवला नाही. त्यामुळेच घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये भन्नाट कामगिरी केल्यानंतरही मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये देवदत्तला आरसीबीकडून एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. विराटने देवदत्तला संपूर्ण हंगामामध्ये राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसवून ठेवलं.

मात्र मागील हंगामामध्ये एकही सामना न खेळणाऱ्या देवदत्तमुळेच आज आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये यंदा देवदत्त पहिल्या क्रमाकांवर आहे. विराट, ए.बी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज संघात असतानाही देवदत्तने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. देवदत्तने १४ सामन्यांमध्ये ३३.७१ च्या सरासरीने ४७२ धावा केल्या आहेत. या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. केवळ के. एल. राहुल (६७० धावा) आणि शिखर धवन (५२५ धावा) हे दोघेच देवदत्तपेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू आहेत.