कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. त्यातच केदार जाधवने मोक्याच्या क्षणी वाया घालवलेले चेंडू आणि संथ फलंदाजी याचा चेन्नईला मोठा फटका बसला. सोशल मीडियावर अनेकांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली. अनेकांनी जाडेजा-ब्राव्हो या कसलेल्या फलंदाजांआधी जाधवला फलंदाजीसाठी आधी कसं पाठवलं याबद्दलही प्रश्न उपस्थित केले.

चेन्नईच्या पराभवानंतर केदार जाधववर प्रचंड टीका करण्यात आली. भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. “कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मिळालेलं आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी पूर्ण करायला हवं होतं. सामना चेन्नईच्या हातात होता, पण ज्याप्रकारे केदार जाधव आणि रवींद्र जाडेजा हे दोघे खेळले, त्यामुळे चेन्नईने हातातला सामना गमावला. चेन्नईचे काही फलंदाज हे सरकारी कर्मचारी असल्यासारखे वागतात. त्यांना ही गोष्ट माहिती असते की चांगलं खेळलं काय किंवा वाईट खेळलं काय.. पगार (मानधन) तर मिळणारच आहे”, असं स्पष्ट मत सेहवागने क्रिकबझशी बोलताना व्यक्त केलं.

 

View this post on Instagram

 

Tripathi Ki Laathi. Catch the fresh episode of ‘Viru Ki Baithak’ every morning only on Facebook Watch #CricketTogether

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

१६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली होती. फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. डु प्लेसिस लवकर बाद झाला पण अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच रायुडू आणि वॉटसन बाद झाले. पाठोपाठ धोनीदेखील माघारी परतला. तशातच जाडेजासारखा अनुभवी खेळाडू समोर असतानाही केदार जाधवने शेवटच्या षटकात दोन चेंडू निर्धाव घालवले, त्यामुळे रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीचा उपयोग होऊ शकला नाही आणि चेन्नईला पराभूत व्हावं लागलं.