IPL 2020 CSK vs KXIP: सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनीच नाबाद १७९ धावा ठोकत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईचा केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
१६व्या षटकात सॅम करन गोलंदाजी करत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर निकोलस पूरनने हवेत फटका मारला. तो चेंडू केदार जाधवने जागेवरच उभा राहून अडवला आणि धोनीकडे फेकला. परंतु केदारने तो चेंडू झेलण्यासाठी थोडं पुढे धावत जायला हवं होतं असं जाडेजाला वाटत होतं. तसंच फलंदाज एकच्या जागी दुहेरी धाव घेण्यात यशस्वी झाल्याने सॅम करनही नाखुश असल्याचं दिसून आलं. या प्रकारानंतर जाडेजा आणि केदार जाधव यांच्यात मैदानात काहीशी बाचाबाची झालेलीदेखील पाहायला मिळाली.
पाहा व्हिडीओ-
— faceplatter49 (@faceplatter49) October 4, 2020
दरम्यान, पंजाबच्या डावात कर्णधार राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले. त्याला मनप्रीत सिंग आणि निकोलस यांची साथ मिळाली. म्हणून पंजाबने १७८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. वॉटसनने आपलं विसावं अर्धशतक पूर्ण केलं. तर डु प्लेसिसने १५वं अर्धशतक ठोकलं. डु प्लेसिसच्या नाबाद ८७ आणि वॉटसनच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर चेन्नईने ऐतिहासिक विजय मिळवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 4:51 pm