दिल्ली आणि हैदराबाद या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला अखेर संधी देण्यात आली. आधीच्या दोन IPL सामन्यात हैदराबादच्या संघाकडून विल्यमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्या दोन्ही सामन्यात हैदराबादचा संघ पराभूत झाला. त्यानंतर फलंदाजी बळकट करण्यासाठी अखेर विल्यमसनला संघात स्थान देण्यात आले. विल्यमसनसोबतच जम्मू काश्मीरच्या अब्दुल समादलाही संघात स्थान मिळाले. याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरने मैदानात पाऊल टाकत अनोखं अर्धशतक पूर्ण केलं.

डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक गमावली, पण हा सामना मात्र वॉर्नरसाठी खास ठरला. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डेव्हिड वॉर्नरने मैदानात पाऊल टाकताच अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. डेव्हिड वॉर्नरचा कर्णधार म्हणून हा ५०वा सामना ठरला. एका संघाचं ५० सामन्यांत नेतृत्व करणारा वॉर्नर IPLमधला नववा कर्णधार ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, अॅडम गिलक्रिस्ट, शेन वॉर्न, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या पंगतीत वॉर्नरने स्थान मिळवले.

दरम्यान, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निवड केली. दिल्लीने आपल्या संघात महत्त्वाचा बदल करत अनुभवी इशांत शर्माला संघात स्थान दिले. तर आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवला. हैदराबादनेदेखील संघात दोन बदल करत विल्यमसनला मोहम्मद नबीच्या जागी संघात स्थान दिले. तर वृद्धिमान साहाच्या जागी अब्दुल समादला संघात जागा दिली.