आयपीएलच्या तेराव्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत आश्वासक कामगिरी केली आहे. परंतू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याआधी दिल्लीच्या संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उरलेला संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाहीये. शनिवारी शारजात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती.

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिल्ली कॅपिटल्समधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “कोलकात्याविरुद्ध सामन्यात अमितच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं होतं. ज्याचा अहवाल आला असून त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. तो यापुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. आम्हाला अमित मिश्राच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची याचा विचार करावा लागेल. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमित मिश्रा फॉर्मात येत असतानाच त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे. त्याचा अनुभव संघातील इतर गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरायचा.” कोलकात्याविरुद्ध सामन्यातही अमित मिश्राने शुबमन गिलची विकेट घेतली होती.