आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज संजू सॅमसन सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांविरोधात झालेल्या सामन्यात संजूने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सातत्याने चांगली खेळी करुनही भारतीय संघात संधी मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संजू सॅमसनला पाठींबा वाढतो आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत असताना संजूच्या फलंदाजीतही लक्षणीय फरक पडला आहे. पूर्वीपेक्षा त्याची फटकेबाजी अधिक चांगली झालेली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम फिल्डींग ! पूरनच्या कसरतीवर सचिन फिदा

“गेल्या वर्षभरापासून माझी फलंदाजी सुधारली आहे, फटके आता चांगल्या पद्धतीने खेळले जात आहेत. त्यामुळे मी माझा नेहमीचा सराव सुरु ठेवतोय आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरतोय. संघाच्या विजयात माझा मोलाचा सहभाग आहे हे पाहून मला खरंच आनंद होतोय. काही वर्षापूर्वी मी काही गोष्टींसाठी खूप मेहनत घेत होतो…पण काहीच मनासारखं घडत नव्हतं. अनेकदा खुप नैराश्य आल्यानंतर मी आत्मपरीक्षण केलं आणि मग गोष्टी थोड्याफार प्रमाणात सुकर व्हायला लागल्या. मला नेमकं काय साध्य करायचं आहे हा प्रश्न मी मलाच विचारला. अजुन पुढची १० वर्ष मी याच तडफेने खेळू शकतो आणि ती १० वर्ष मला असाच खेळ करायचा आहे.” पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना संजूने आपल्या फलंदाजीचं गुपित सांगितलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : क्रिकेटसाठी वयाच्या दहाव्या वर्षी सोडलं घर, वाचा कसा घडला यशस्वी जैस्वाल??

पंजाबविरुद्ध २२४ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत संजूने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. आपल्यात आलेली ताकद ही वडिलांकडून आल्याचं संजूने सांगितलं. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतियानेही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर ५ षटकार लगावत सामना राजस्थानच्या दिशेने झुकवला. ४ गडी राखून राजस्थानने पंजाबवर मात केली.