IPL 2020 सुरू झाल्यापासून फॉर्मसाठी झगडत असलेला कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याला अखेर सूर गवसला. २९ चेंडूत त्याने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत ६ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. कार्तिकने २९ चेंडूत ५८ धावा कुटल्या तर शुबमन गिलने ४७ चेंडूत ५७ धावांची संयमी खेळी केली. अर्शदीप सिंग आणि रवि बिश्नोई या दोन नव्या दमाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत १-१ गडी बाद केला.

कर्णधार दिनेश कार्तिकने या सामन्यात २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. त्याने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. दिनेश कार्तिकने IPLमध्ये सर्वात जलद अर्धशतक २२ चेंडूत लगावले होते. २०१८साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. त्यानंतर आज त्याला त्यापेक्षा जलद अर्धशतक लगावण्याची संधी होती, पण आजही त्याने २२ चेंडूतच अर्धशतक गाठले. आणि योगायोग म्हणजे आजही हे अर्धशतक त्याने पंजाबविरूद्धच लगावले होते.

नाणेफेक जिंकून कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या षटकांमध्ये हा निर्णय फसल्यासारखं वाटलं. राहुल त्रिपाठी ४ धावांवर तर नितीश राणा २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल आणि मॉर्गन या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मॉर्गन खेळपट्टीवर स्थिरावला असतानाच झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २ चौकार व १ षटकार खेचत २४ धावा केल्या. मग गिल आणि कर्णधार कार्तिक यांना कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली. याचदरम्यान दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. गिल ५७ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसेलही ५ धावांवर माघारी परतला. कार्तिक मात्र शेवटपर्यंत मैदानात उभा होता. त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, बिश्नोई आणि सिंग यांनी १-१ बळी टिपला.