कर्णधार इयॉन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर कोलकाताने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी निराशा केली.

राजस्थानच्या संघाने पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये तब्बल ५ बळी गमावले. बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि रियन पराग या महत्त्वाच्या फलंदाजांनी स्वस्तात तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर राहुल तेवातियाने राजस्थानच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण वरूण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर त्याने कार्तिककडे झेल सोपवला. IPL कारकिर्दीत यष्टीरक्षक म्हणून हा कार्तिकचा ११०वा झेल ठरला. महेंद्रसिंग धोनीने IPL कारकिर्दीत किपिंग करताना आतापर्यंत सर्वाधिक १०९ झेल टिपले होते. तो विक्रम मोडत दिनेश कार्तिकने इतिहास रचला.

दरम्यान, आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाताचा डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण नंतर शुबमन गिल ३६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ सुनिल नारायण, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल हेदेखील स्वस्तात परतले. पण कर्णधार मॉर्गनने ६८ धावांची खेळी केली.