चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो पुढील काही सामने खेळू शकणार नसल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून मात केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना फ्लेमिंगने याबद्दल माहिती दिली.

कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राव्हो दुखापतग्रस्त झाला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यात गोलंदाजी करणं टाळलं होतं. याच दुखापतीमधून सावरण्यासाठी चेन्नई संघ व्यवस्थापनाने ब्राव्होला काही दिवस विश्रांती देण्याचं ठरवलं आहे. ब्राव्होच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सॅम करनने पहिल्या सामन्यात आश्वासक खेळी केली. गोलंदाजीत २८ धावा देत १ बळी घेऊन अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत त्याने १८ धावा केल्या.