मुंबई इंडियन्सविरुद्ध खराब कामगिरी करण्याची परंपरा कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवली आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.

नाणेफेक जिंकून मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू मुंबई इंडियन्सच्या माऱ्यासमोर कोलकात्याची आघाडीची फळी पुरती ढेपाळली. मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवासाठी कर्णधार मॉर्गननेही संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर खापर फोडलं आहे. “सुरुवातीला फलंदाजी करताना आमच्याकडून काही चुका झाल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये केलेला मारा खरंच कौतुक करण्यासारखा होता. यापुढे फलंदाजीवर आम्हाला अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. आताशी स्पर्धा मध्यावर आलेली आहे…यानंतर आणखी काही सामने होणार आहेत. त्यामुळे चुका सुधारून चांगला खेळ करण्याची आमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॉर्गनने आपलं मत मांडलं.

यावेळी बोलत असताना मॉर्गनने कोलकाताच्या फलंदाजांनी मैदान आणि खेळपट्टी पाहून आपल्या फलंदाजीत बदल करण्याची गरज असल्याचं म्हणलं. यापुढील सामन्यांमध्ये गरजेनुसार संघात बदल केले जातील असंही मॉर्गन म्हणाला. मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीचे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र यानंतर पॅट कमिन्स आणि मॉर्गनने नाबाद भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.