IPL 2020 DC vs RR: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकांत १८०पार मजल मारली. शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस या दोन परदेशी खेळाडूंनी दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोठा वाटा उचलला. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर दिल्लीने ८ बाद १८४ धावा कुटल्या आणि राजस्थानला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरकडून राजस्थानला खूप अपेक्षा होत्या, पण शिखर धवनने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. अश्विनने टाकलेल्या चेंडूवर बटलरने बॅट फिरवली. चेंडू हवेत जाणार इतक्यात शिखर धवनने झेप घेतली आणि गब्बर स्टाइल झेल घेत बटलरला माघारी धाडले.

त्याआधी, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरू केली होती, पण त्यात त्यांचेच फलंदाज अडकले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला ५ धावांवर तर पृथ्वी शॉला १९ धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल अशी अपेक्षा होती पण तेवढ्यात दिल्लीच्या डावात माशी शिंकली. अय्यर १७ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्याने ५ धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ षटकारांसह ३० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. ५ षटकारांसह २४ चेंडूत त्याने ४५ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने ८ चेंडूत १७ धावांची खेळी करत संघाला १८०पार मजल मारून दिली.