Dream11 IPL 2020 UAE : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धचा सामना मुंबई इंडियन्सने ४९ धावांनी जिंकला. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९५ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळी करत ६ षटकार लगावले. या आव्हानाचा पाठलाग करणं कोलकाताला जमलं नाही. हा सामना कायरन पोलार्डसाठी महत्त्वाचा ठरला. मुंबईसाठी आपला १५०वा सामना खेळणाऱ्या पोलार्डने तब्बल दोन वर्षांनंतर गोलंदाजी केली. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी तयार नसल्याने पोलार्डला गोलंदाजी देण्यात आल्याची चर्चा रंगली. त्यानंतर आता ‘मुंबई इंडियन्स’कडून हार्दिक पांड्याबद्दल महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईच्या गोलंदाजीच्या वेळी ट्रेंट बोल्ट आणि पॅटीन्सन यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने देखील चांगली गोलंदाजी केली. पण या तिघांनंतर गोलंदाजीला चक्क कायरन पोलार्ड आला आणि साऱ्यांचे भुवया उंचावल्या. हार्दिक पांड्यासारखा गोलंदाजाऐवजी पोलार्डला गोलंदाजी का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमधील जहीर खानने (Director of Cricket Operations) हार्दिक पांड्याबाबत माहिती दिली.

“आम्ही सारेच अशी अपेक्षा करतो की हार्दिक लवकरच गोलंदाजी करताना दिसेल. तो जेव्हा संघासाठी गोलंदाजीही करतो तेव्हा कोणत्याही संघासाठी ते लाभदायक ठरतं. त्यालाही ही बाब माहिती आहे पण त्याच्या तब्येतीची काळजी घेणंदेखील तितकंच जरूरीचं आहे. आम्ही या संदर्भात फिजीओशी चर्चा केली आहे. लवकरच हार्दिक गोलंदाजाच्या भूमिकेत दिसावा यासाठी आम्ही सारेच प्रयत्नशील आहोत. त्याला स्वत:ला सुद्धा गोलंदाजी करायची आहे, फक्त सध्या त्याची तंदुरूस्ती अधिक महत्त्वाची आहे”, असं जहीर खान म्हणाला.