आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली असून प्रत्येक दिवशी रंगणारे सामने उत्कंठावर्धक होत आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये तरुण भारतीय खेळाडूंची कामगिरी ही वाखणण्याजोगी आहे. राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करणारा संजू सॅमसन गेल्या काही सामन्यांपासून धडाकेबाज खेळी करतो आहे. ३ सामन्यांपैकी २ सामन्यांत संजूने आक्रमक अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना संजूच्या या आक्रमक खेळीमुळे चांगलीच प्रभावित झाली आहे. संजू सॅमसनमुळे स्मृतीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला पाठींबा द्यायला सुरुवात केली आहे.

“संजू सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय हे पहायला मला खूप आवडतंय. संजूने यंदा ज्या पद्धतीने फलंदाजी केलीये ते पाहता मी त्याची चाहती झाले आहे. त्याच्यामुळेच मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करायला लागले आहे. तो ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो ती पाहिल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं, तो सध्या वेगळ्या दर्जाचा खेळ करतोय. मी सध्या आयपीएलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रांत चांगली कामगिरी करणाऱ्यांकडून सर्वकाही शिकून घ्यायचं ठरवलं आहे.” स्मृती इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

दरम्यान, आतापर्यंत तेराव्या हंगामात संजूने दोन धडाकेबाज अर्धशतकी खेळींची नोंद केली आहे. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी आतापासून भारतीय संघात आता ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. अनेक माजी खेळाडूंनी संजूला अद्याप भारतीय संघात संधी कशी मिळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय.

अवश्य वाचा – IPL 2020 : …तर संजू सॅमसन लवकर भारताकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत खेळेल !