दिल्लीविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६०पार मजल मारली. कर्णधार म्हणून आपला ५०वा सामना खेळणाऱ्या वॉर्नरला अर्धशतकाने मात्र हुलकावणी दिली. पण आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या विल्यमसनने मात्र आपली निवड सार्थ ठरवली.

आजच्या सामन्यात आपला पहिला IPL सामना खेळणारा काश्मीरचा अब्दुल समाद हा खास आकर्षण ठरला. त्याने १ चौकार आणि १ षटकार ठोकत ७ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या. त्यातील त्याचा षटकार अतिशय खास ठरला. एनरिक नॉर्ये १९व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकत होता, त्यावेळी समादने त्याला तब्बल ८५ मीटर लांब षटकार खेचला आणि साऱ्यांनाच अवाक केलं.

पाहा षटकार-

दरम्यान, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार खेळ करत संघाला ७७ धावांची सलामी मिळवून दिली. कर्णधार म्हणून आपला ५०वा सामना खेळणारा वॉर्नर सामन्यात मात्र अर्धशतक ठोकू शकला नाही. दमदार फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक पाच धावांनी हुकलं. त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. बेअरस्टोने मात्र दमदार फटेबाजी करत अर्धशतक ठोकलं. बेअरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत ५३ धावा केल्या. विल्यमसननेदेखील चांगली फलंदाजी केली. त्याने २६ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा केल्या.