आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने पहिलाच सामना गाजवला. चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करत संजू सॅमसनने अर्धशतक झळकावलं. त्याच्या या आक्रमक खेळीनंतर अनेक माजी खेळाडूंनी संजूला भारतीय संघात जागा मिळायला हवी अशी मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरही क्रिकेटप्रेमी भारतीय संघात ऋषभ पंतऐवजी संजूला संधी द्या अशी मागणी करत आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटॉर आणि माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्ननेही संजूच्या खेळीचं कौतुक केलंय.

“संजू सॅमसन खरंच गुणवान खेळाडू आहे. मी याआधीही अनेकदा सांगितलं आहे की आताच्या घडीला संजू सॅमसन हा प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतीय संघात आतापर्यंत जागा मिळत नाही हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटतं. तो उत्तम फलंदाजी करतो, त्याचं यष्टीरक्षण चांगलं आहे, तो चांगले फटके खेळतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात तो असाच फॉर्मात राहिला तर राजस्थानचा संघ नक्कीच आयपीएल जिंकेल आणि भविष्यात त्याला भारतीय जर्सीत पहायला मला आवडेल.” शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.

अवश्य वाचा – BLOG : संजू सॅमसनवर आपण अन्याय करतोय का??

चेन्नईविरुद्ध सामन्यात संजू सॅमसनने फटकेबाजी करत १९ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ३२ चेंडूत ७४ धावा करणाऱ्या संजूला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सॅमसन आणि स्मिथ यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने चेन्नईविरुद्ध सामन्यात द्विशतकी मजल मारली होती.