आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये संघातील दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण आणि रैना व हरभजन यासारख्या खेळाडूंनी घेतलेली माघार यामुळे चेन्नईसमोर संकट निर्माण झालं होतं. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं पारड जड असेल असं म्हटलं आहे.

“ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. दोन्ही गोलंदाज नावाजलेले आहेत आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी आतापर्यंत बहारदार कामगिरी केली आहे. माझ्यामते सलामीच्या सामन्यात चेन्नईसमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. रैनाच्या अनुपस्थितीत संघाला एका चांगल्या खेळाडूची गरज आहे. शेन वॉटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय आणि गेल्या काही महिन्यात त्यानेही फारसं क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळे बुमराह आणि बोल्ट यांच्याविरोधात तो कसा खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं बलाबल लक्षात घेता मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे आणि त्यांना विजयाची अधिक संधी आहे असं माझं मत आहे.” गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK समोरची चिंता कायम, ऋतुराज गायकवाड अजुनही करोनाग्रस्त

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. रोहित शर्माच्या संघाच्या नावावर आतापर्यंत ४ आयपीएल विजेतेपद जमा आहेत. २०१९ साली झालेल्या अंतिम सामन्यातही मुंबईने चेन्नईवर एका धावेने मात केली होती. त्यामुळे तेराव्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला शारजामधील तयारीचा आढावा