आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांमुळे टीकेचं धनी बनलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी संपूर्ण सामन्याच वर्चस्व गाजवत पंजाबच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिलं नाही. वॉटसनने नाबाद ८३ तर डु-प्लेसिसनेही नाबाद ८७ धावांची खेळी केली.

सलग तीन सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतरही धोनीने संघातील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पाठींबा देत त्यांना आणखी एक संधी दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे या खेळाडूंनीही संधीचं सोनं करुन दाखवलं. “खडतर काळातही खेळाडूंना पाठींबा देत राहणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. मला असं अनेकदा वाटतं की चेन्नईच्या यशात स्टिफन फ्लेमिंगला म्हणावं तितकं श्रेय मिळत नाही. ज्यावेळी प्रशिक्षकाच्या डोक्यात वेगळी रणनिती असते आणि कर्णधार काहीतरी वेगळा विचार करत असतो तेव्हा दोघांचाहीह मेळ घालणं खूप कठीण असतं. अनेकदा यामुळे संभ्रमही निर्माण होतो. पण चांगली गोष्ट म्हणजे आमच्यात जे काही ठरतं ते आम्ही ड्रेसिंग रुमबाहेर जाऊ देत नाही. मैदानावर आलो की आमचा एकमेकांना पाठींबा असतो. आमच्यात कधी मतभेद होत नाहीत अशातला भाग नाही, पण ते आमच्या दोघांपुरते आणि क्षणिक असतात. गेले अनेक हंगाम स्टिफन आमच्यासोबत काम करतोय.” सामना संपल्यानंतर धोनीने प्रशिक्षक फ्लेमिंगच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले.

अवश्य वाचा – IPL 2020 : ठोकर खाऊनच माणूस ‘ठाकूर’ बनतो ! सेहवागकडून मराठमोळ्या शार्दुलचं कौतुक

चेन्नईच्या दृष्टीकोनातून पंजाबविरुद्धचा सामना हा खूप आश्वासक ठरला. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. याव्यतिरीक्त चेन्नईच्या गोलंदाजांनीही अखेरच्या षटकांत दमदार पुनरागमन करत पंजाबला १७८ धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : तब्बल ७ वर्षांनी जुळून आला योगायोग, CSK समोर पंजाब हतबल