News Flash

IPL 2020 : खूप प्रयत्न केला पण….सलग तिसऱ्या पराभवानंतर धोनीचे हताश उद्गार

धोनीची नाबाद ४७ धावांची खेळी व्यर्थ

फोटो सौजन्य - Ron Gaunt / Sportzpics for BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या खराब कामगिरीचं सत्र सुरुच आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. शेवटच्या षटकांत धोनी-जाडेजाने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. परंतू अखेरीस चेन्नईचे हे प्रयत्न ७ धावांनी तोकडेच पडले. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात ३६ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या सामन्यात दुबईतील उष्ण वातावरणामुळे धावा काढताना धोनीला त्रासही झाला. मैदानात धापा टाकताना धोनीचं चित्र पहिल्यांदाच चाहत्यांना पहायला मिळालं. “अनेक चेंडूंवर माझे फटके योग्य बसत नव्हते. मी खूप प्रयत्न केले पण त्यात काही यश आलं नाही. ज्यावेळी खेळपट्टी साथ देत नसते त्यावेळी तुम्ही फटक्यांचं टायमिंग योग्य साधणं गरजेचं असतं. खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती पाहता जोरात फटकेबाजी करणं गरजेचं आहे असं आम्हाला प्रत्येकाला जाणवत होतं.” सामना संपल्यानंतर आपल्या खेळीबद्दल बोलत असताना धोनीच्या बोलण्यातली हतबलता जाणवत होती.

अवश्य वाचा – BLOG : दमलेल्या धोनीची ही कहाणी…

मैदानात धोनीला दम लागल्यानंतर त्याने काहीकाळ विश्रांती घेत वैद्यकीय मदत घेतली. याबद्दल विचारलं असता धोनी म्हणाला, “इथलं वातावरण खूपच उष्ण आहे. त्यामुळे घसा लवकरच सुकतो आणि ज्यावेळी तुम्हाला लक्षणं जाणवायला लागतात त्यावेळी तुम्ही थोडा वेळ थांबूच शकता.” हैदराबादविरुद्ध सामन्यात धोनीने संघात ३ बदल केले तरीही चेन्नईला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी चेन्नईला आपल्या रणनितीत बदल करावा लागणार असल्याचं दिसतंय.

अवश्य वाचा – IPL 2020 : वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 2:41 pm

Web Title: i was not able to middle lot of deliveries was trying to hit too hard says ms dhoni psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण !
2 IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी ! बेन स्टोक्स युएईला रवाना
3 BLOG : दमलेल्या धोनीची ही कहाणी…
Just Now!
X