आयपीएलच्या तेराव्या हंगामाची बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी संध्याकाळी घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे मुंबई आणि चेन्नई यांच्यात यंदाच्या हंगामाला सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. अबुधाबी येथे हा सामना रंगेल. आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्जने पाचवेळा आयपीएलच्या इतिहासात सलामीचा सामना खेळला आहे. आणि या पाचही हंगामात संघाची कामगिरीही संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. यंदा सलामीचा सामना खेळण्याची चेन्नई सुपरकिंग्जची ही सहावी वेळ ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार कोण?? ब्राव्हो म्हणतो…

आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्जने २००९, २०११, २०१२, २०१८ आणि २०१९ या पाच हंगामांमध्ये स्पर्धेची सुरुवात केली आहे. यापैकी २०११ आणि २०१८ या हंगामात चेन्नईला विजेतेपद मिळालं आहे. तर २०१२ आणि २०१९ या दोन हंगामात चेन्नईला उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. २००९ हा एकमेव हंगाम असा होता की जिथे चेन्नईचा संघ अंतिम सामन्याच पोहचू शकला नव्हता. त्यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या गोटातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. यामुळे संपूर्ण संघाचा दुबईतला क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला होता. अखेरीस खेळाडूंच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.

अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक