आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व संघांमधली चूरस आता अधिक रंगतदार झालेली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने जोरादर मुसंडी मारत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. काही दिवसांपूर्वी स्पर्धेतून बाहेर जाईल अशा अवस्थेत असलेल्या पंजाबच्या संघाला ख्रिस गेलच्या येण्यामुळे एक नवसंजीवनी मिळाली आहे. पंजाबने गेल्या काही दिवसांमध्ये गुणतालिकेत अव्वल तीन स्थानांवर असलेल्या दिल्ली, मुंबई आणि RCB या तिन्ही संघांना पराभवाचं पाणी पाजलं. पंजाबच्या संघात हा अमुलाग्र बदल होण्यामागची कारण काय असतील याचा आपण आढावा घेऊया…

३) गोलंदाजीत पर्याय – सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पंजाबच्या संघासमोर डेथ ओव्हर्समध्ये कोणाला गोलंदाजी द्यायचा हा मोठा प्रश्न असायचा. ५ गोलंदाजांनिशी खेळणाऱ्या पंजाबच्या संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अखेरच्या षटकांमध्ये हाराकिरी केली होती. उदा. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर राजस्थानच्या राहुल तेवतियाने मारलेले ५ षटकार…मात्र गेल्या काही सामन्यांपासून पंजाबने संघात आश्वासक बदल करत जिमी निशम, ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून ४-४ षटकांचा कोटा पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच युवा अर्शदीप सिंहदेखील चांगला मारा करतोय. त्यामुळे अखेरच्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांवर येणारं दडपण आता कमी होताना दिसत आहे.

२) लोकेश राहुल अधिक मुक्त होऊन खेळतोय – ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या लोकेश राहुलने यंदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे. परंतू काही सामन्यांमध्ये राहुलवरही संथ सुरुवात करण्यावरुन टीका झाली होती. यानंतर राहुलने आपल्या शैलीत बदल करुन अधिक मोकळेपणाने खेळण्यास सुरुवात केली आहे. RCB विरुद्ध करो या मरो चा सामना आणि मुंबईविरुद्ध सामन्यात राहुलने अशाच पद्धतीने बहारदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

१) ख्रिस गेलच्या येण्यामुळे मोठा दिलासा – सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पंजाबने ख्रिस गेलला संधी दिली नाही. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल ही जोडी सेट झालेली असल्यामुळे पंजाबच्या टीम मॅनेजमेंटने फारसे बदल केले नाहीत. परंतू संघाची खराब कामगिरी लक्षात घेता गेलला संघात स्थान देण्यात आलं आणि यानंतर पुढचे सलग ३ सामने पंजाब जिंकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या ख्रिस गेलमुळे संघाला एक मोठा आधार मिळाला आहे. मुंबईविरुद्ध रंगलेल्या सुपरओव्हरच्या थरारनाट्यातही गेलने आपली चमक दाखवली होती.