अप्रतिम लयीत असणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. मार्कस स्टॉयनीसने अष्टपैलू कामगिरी करत संघाला १७ धावांनी विजय मिळवून दिला. कगिसो रबाडाने लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत ४ बळी टिपले. आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. दिल्लीच्या कामगिरीवर खुश झालेल्या विरेंद्र सेहवागने हटके शैलीत संघाचं कौतुक केलं आहे. सलमान खानच्या ऐसा पहली बार हुआ है सतरा अठरा सालो मे…या गाण्याचं मिम पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

१९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत ६७ धावा केल्या. विल्यमसन बाद झाल्यानंतर नवख्या अब्दुल समदने २ चौकार आणि २ षटकार लगावत १६ चेंडूत ३३ धावा कुटल्या. पण रबाडाने १९व्या षटकात त्याच्यासह राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी दोघांना माघारी पाठवत सामना एकतर्फी केला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनीसनेदेखील ३ बळी टिपले.