पंजाबविरुद्ध सामन्यात १० गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन करणाऱ्या CSK ला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. KKR च्या गोलंदाजांनी अबु धाबीच्या मैदानावर दमदार पुनरागमन करत CSK ला पराभवाचा धक्का दिला. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू ही जोडी मैदानात असताना एका क्षणाला चेन्नई सुपरकिंग्ज सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. परंतू हे दोन्ही फलंदाज माघारी परतले आणि सामन्याचं चित्रचं पालटलं. कर्णधार महेंद्रसिंह धोनीही फारशी चमक दाखवू शकला नाही. सामना संपल्यानंतर धोनीने या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे.

“मधल्या षटकांमध्ये एक क्षण असा होता की जिकडे KKR च्या गोलंदाजांनी २-३ षटकं खूप चांगली टाकली. यानंतर आम्ही लागोपाठ २-३ विकेट गमावल्या. जर त्या क्षणी आम्ही सांभाळून फलंदाजी केली असती तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता. गोलंदाजीदरम्यानही नवीन चेंडू असताना आम्ही खूप धावा दिल्या. परंतू यानंतर कर्ण शर्मा, सॅम करन यांनी सुरेख गोलंदाजी करत सुंदर पुनरागमन केलं. हे आव्हान आम्ही सहज पूर्ण करायला हवं होतं. परंतू गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फिरवलं आणि निराश केलं.” धोनीने सामना संपल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK चे चाहते केदार जाधवर नाराज, हे ३ खेळाडू घेऊ शकतात संघात त्याची जागा

मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.