‘आयपीएल’मध्ये शनिवारी सायंकाळी होणाऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी १० सामन्यांतून ८ गुण असल्याने बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक आहे.

के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबने ख्रिस गेलचे आगमन झाल्यापासून सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून हैदराबादविरुद्धसुद्धा ते त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असतील. राहुल, मयांक अगरवाल या भारतीय जोडीबरोबरच विंडीजच्या गेल-निकोलस पूरन यांच्या स्वरूपात त्यांच्याकडे धडाकेबाज फलंदाजही उपलब्ध आहेत. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलही पुन्हा लयीत परतला आहे.

मोहम्मद शमी गोलंदाजीचे नेतृत्व प्रभावीपणे करत आहे. ख्रिस जॉर्डनच्या जागी पुन्हा शेल्डन कॉट्रेलला पंजाब संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन फिरकीची बाजू समर्थपणे सांभाळत आहेत.

दुसरीकडे हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अपयशानंतरही राजस्थान रॉयल्सला सहज धूळ चारली. मनीष पांडे आणि विजय शंकर यांना गवसलेला सूर हैदराबादच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. केन विल्यम्सनच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याने तो खेळणार की नाही, हे सामन्याच्या दिवशी सकाळीच स्पष्ट होईल. जेसन होल्डरच्या समावेशामुळे हैदराबादची गोलंदाजी बळकट झाली आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार