इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामामध्ये कोलकाता नाइट रायडर्स आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. एकीकडे पहिल्याच सामन्यात पराभव झालेला मुंबई इंडियन्सचा संघ पहिला विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरेल तर दुसरीकडे मालिकेची सुरुवात विजयाने करण्यासाठी कोलकत्याचा संघ प्रयत्न करेल. मात्र दोन वेळचा ‘आयपीएल’ विजेता ठरलेल्या कोलकात्याच्या संघाचे स्वागत अगदी खास पद्धतीने झाले.  जगातील सगळ्यात उंच इमारत असणाऱ्या बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करत दुबईमध्ये कोलकात्याच्या संघाचे स्वागत करण्यात आलं आहे. या रोषणाईचा व्हिडिओ केकेआरच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आला आहे.

केकेआरचा मालक असणारा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा दुबई टुरिझमच्या जाहिरातीमध्येही यापूर्वी झळकला होता. शाहरुखची दुबईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. केकेआरचे इतर संघांपेक्षा अशा भव्यदिव्य पद्धतीने स्वागत होण्यामागे शाहरुख कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तही बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करण्यात आली होती.

सामना ठरणार रंगतदार

नामांकित खेळाडूंनी सजलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यात मुंबई यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईला २०१३पासून अद्याप एकाही हंगामात सलामीची लढत जिंकता आली नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही मुंबईने ही परंपरा कायम राखली. मात्र मुंबईच्या क्षमतेविषयी सर्वानाच ठाऊक असून ते एका पराभवाने खचून न जाता झोकात पुनरागमन करण्यात पटाईत आहेत. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर आहे. चेन्नईविरुद्ध रोहित १२ धावांतच माघारी परतला. तेथूनच मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. त्याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंडय़ाने मुंबईसाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. कोलकाता संघात अनेक फिरकीपटूंचा भरणा असल्याने त्यांच्याविरुद्ध हार्दिक कशी फलंदाजी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईसाठी पहिलाच सामना खेळणाऱ्या ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनी चांगली गोलंदाजी केली. परंतु भरवशाचा जसप्रीत बुमरा अपयशी ठरल्यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या वेळी बुमराने कामगिरीत सुधारणा करणे अपेक्षित आहे. राहुल चहर आणि कृणाल पंडय़ा मुंबईची फिरकीची बाजू सांभाळतील.

दुसरीकडे दोन वेळचा ‘आयपीएल’ विजेता कोलकाताचा संघ आंद्रे रसेलवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. गतवर्षी रसेलनेच कोलकातासाठी सर्वाधिक धावा आणि बळी मिळवले होते. परंतु यंदा रसेलबरोबरच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इआन मॉर्गनच्या फलंदाजीवरही चाहत्यांचे लक्ष असेल. रसेलचे अंतिम ११ खेळाडूंतील स्थान पक्के असले तरी मॉर्गनलाही पहिल्याच लढतीत खेळायची संधी मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शुभमन गिल कोलकाताकडून सलामीला येणे अपेक्षित आहे. गोलंदाजीत कोलकाताला पॅट कमिन्सकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. यंदाच्या ‘आयपीएल’चा कमिन्स सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. कुलदीप यादव आणि सुनील नारायण हे फिरकीपटूही कोलकाताच्या ताफ्यात असल्याने त्यांचा संघ समतोल वाटत आहे.