IPL च्या प्रत्येक हंगामात पंचांनी दिलेले वादग्रस्त निर्णय हा नेहमी चर्चेचा विषय असतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर चेंडू वाईड असतानाही धोनी आणि शार्दुलने टाकलेल्या दबावामुळे पंच पॉल राफल यांनी आपला वाईडचा निर्णय मागे घेतला होता. ज्यावरुन धोनीवर टीकाही झाली. RCB चा कर्णधार विराट कोहलीने यासंदर्भात एक अजब मागणी केली आहे. आयपीएलमध्ये कर्णधारांना वाईड बॉल आणि कमरेवर चेंडू गेल्यास मिळणाऱ्या नो-बॉलच्या निर्णयांमध्ये DRS घेण्याचा पर्याय मिळायला हवा असं विराटने म्हटलंय.

“एक कर्णधार म्हणून मी याविषयी आपलं मत मांडेन. कर्णधार म्हणून वाईड बॉलच्या निर्णयावर किंवा कमरेवर जाणाऱ्या चेंडूवर मिळणाऱ्या नो-बॉलच्या निर्णयावर DRS घेण्याची संधी मिळायला हवी. अनेकदा वाईड- नो-बॉलचे निर्णय देताना चूक होते. आयपीएल किंवा टी-२० क्रिकेटमध्ये एक छोटा निर्णय सामना पलटवण्यासाठी पुरेसा असतो हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. स्पर्धेत तुम्ही एक रनने सामना गमावता आणि एखादा चेंडू वाईड असूनही तो दिला गेला नसेल तर संपूर्ण स्पर्धेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.” एका खासगी ब्रँडने आयोजित केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये विराट बोलत होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB च्या संघाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही हंगामांमध्ये आपल्या खराब कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारा विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्ले-ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी काळात RCB चा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.