आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आतापर्यंत चांगला सूर गवसल्याचं दिसतंय. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली. RCB कडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने पहिल्या डावात आपली चमक दाखवली. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा आणि महिपाल लोमरोर या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना बाद करत चहलने RCB चं पारडं जड ठेवलं.

४ षटकांत २४ धावा देत चहलने ३ बळी घेतले. या ३ बळींच्या जोरावर चहल आयपीएलमध्ये युएईत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलच्या खात्यात युएईत आता १५ बळींची नोंद आहे.

दरम्यान, राजस्थानच्या संघाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार स्टिव्ह स्मिथ इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू नवदीप सैनीने सापळा रचत बटलरला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पडीकलकडे झेल द्यायला भाग पाडलं. बटलरने २२ धावा केल्या. यानंतर भरवशाचा संजू सॅमसनही ४ धावा काढत चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि महिमाल लोमरोर यांनी संघाचा डाव सावरला. मैदानावर स्थिरावू पाहत असलेल्या रॉबिन उथप्पाला चहलने बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला.