दुबई : चेन्नई सुपर किंग्जचे ‘आयपीएल’मधील आव्हान ११ सामन्यांपैकी आठ पराभवांमुळे आधीच संपुष्टात आले आहे. मोहीम उत्तरार्धाकडे वाटचाल करीत असताना रविवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या लढतीत विजयपथावर परतण्यासाठी चेन्नईचा संघ उत्सुक आहे.

मुंबईविरुद्धच्या लढतीत चेन्नईने युवा ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदीशन यांना संधी दिली, परंतु दोघांनीही घोर निराशा के ली.  सॅम करनचे अर्धशतक हेच त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरले होते.

दुसरीकडे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने १४ गुणांसह बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले असले तरी आणखी एका विजयासह ते पक्के  होऊ शकेल. एबी डीव्हिलियर्सकडे सामन्याचे चित्र एकहाती पालटण्याची क्षमता आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टिच्चून गोलंदाजी करीत कोलकाताच्या नाकी नऊ आणले होते. देवदत्त पडिक्कल सातत्याने धावा करीत आहे.

*  सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

मुंबईविरुद्ध राजस्थानला विजय अनिवार्य

अबू धाबी : मुंबई इंडियन्सने विजयी घोडदौड करीत ‘आयपीएल’च्या बाद फे रीमधील स्थान जवळपास निश्चित केले असले तरी कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीची प्रमुख चिंता त्यांच्यासमोर आहे; पण आव्हान शाबूत राखण्यासाठी मुंबईविरुद्धच्या लढतीत राजस्थानला विजय अनिवार्य आहे. सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर असलेल्या राजस्थानला उर्वरित तिन्ही सामन्यांत विजय आवश्यक आहे. यापैकी एखाद्या पराभवामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल. रोहित शर्माच्या खेळण्याबाबत स्पष्टता आलेली नाही.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.