आयपीएलच्या तेराव्या हंगामात शुक्रवारचा दिवस गाजवला तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेलने. राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने चौफेर फटकेबाजी करत ९९ धावांची खेळी केली. ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार लगावत गेलने राजस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. पहिल्या षटकापासून मैदानावर आलेल्या गेलने अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत पंजाबला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. परंतू शतकापासून अवघी १ धाव दूर असताना गेल आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. हातात आलेली संधी वाया गेल्यामुळे संतापलेल्या ख्रिस गेलने मैदानातच आपली बॅट फेकली.

ख्रिस गेलच्या या कृत्याची दखल घेत सामनाधिकाऱ्यांनी त्याच्या मानधनातून १० टक्के रक्कम कापून घेतली आहे. गेलने आयपीएलच्या Level 1 offence 2.2 या नियमांचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ख्रिस गेलनेही आपली चूक मान्य केल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी ही सुनावणी दंड ठोठावत ही सुनावणी तात्काळ थांबवली. मैदानात षटकारांचा पाऊस पाडत ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकारांचा टप्पा पूर्ण केला. परंतू पंजाबचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले.