आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युनिव्हर्स बॉस हे बिरुद मिरवणाऱ्या ख्रिस गेलने पुन्हा एकदा आपल्यातला धडाकेबाज फॉर्म सिद्ध केला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गेलने मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत ९९ धावांची झुंजार खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत गेलने ६ चौकार आणि ८ षटकार लगावले. या खेळीदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकार ठोकण्याचा भीमपराक्रमही गेलने आपल्या नावावर केला आहे.

कर्णधार लोकेश राहुलसोबत शतकी भागीदारी करताना ख्रिस गेलने संघाचा डाव सावरला. राहुल, निकोस पूरन हे मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतरही गेलने अखेरच्या षटकापर्यंत मैदानात राहून फटकेबाजी सुरु ठेवली. शतकापासून अवघी १ धाव दूर असताना गेल जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

ख्रिस गेलव्यतिरीक्त पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने फटकेबाजी करत ४६ तर निकोलस पूरनने १० चेंडूत २२ धावांची खेळी करत आपलं योगदान दिलं. राजस्थानकडून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.