मोहम्मद शमीने सुरुवातीच्या षटकांमध्ये केलेल्या भेदक माऱ्यामुळे पंजाबने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळताना दणक्यात सुरुवात केली. १०० धावांच्या आतच दिल्लीचा निम्मा संघ माघारी धाडण्यात पंजाबचे गोलंदाज यशस्वी ठरले. परंतू दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू स्टॉयनिसने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करुन सामन्याचं चित्रच पालटवलं. पंजाबच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेताना स्टॉयनिसने २१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.

पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने अखेरचं षटक टाकलं. याच षटकात दिल्लीने खोऱ्याने धावा वसूल केल्या. जॉर्डनने अखेरच्या षटकांत दिलेल्या ३० धावांमुळे दिल्लीचा संघ १५७ धावांचा टप्पा गाठू शकला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडं २० षटकं टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही जॉर्डनचं नाव जोडलं गेलं आहे.

पंजाबकडून मोहम्मद शमीने ३, शेल्डन कोट्रेलने २ तर रवी बिश्नोईने १ बळी घेतला. मात्र अखेरच्या षटकांत गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे सामन्याचं चित्रच पालटलं.