IPL 2019च्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला एका धावेने सामना जिंकवून देणारा अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा याने IPL 2020 स्पर्धेतून बुधवारी माघार घेतली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते काही प्रमाणात नाराज झाले होते. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा एक धडाकेबाज फलंदाजदेखील दुबईत आज (मंगळवारी) दाखल झाला. तो फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस लीन. पीटीआयच्या वृत्तानुसार मंगळवारी लीन अबुधाबीमध्ये दाखल झाला.

मुंबईकडून खेळण्याचे हे त्याचे पहिलेच वर्ष असणार आहे. लीनने २०१२ ते २०१९ या ८ वर्षात ४१ सामने खेळले. त्यात त्याने ९३ धावांच्या सर्वोच्च खेळीसह एकूण १,२८० धावा केल्या. लीनने १४०च्या स्ट्राईक रेटने धावा करत आतापर्यंत १२८ चौकार आणि ६३ षटकार लगावले आहेत. तसेच १० अर्धशतकेही झळकावली आहेत. गेल्या वर्षी कोलकाता संघाकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली होती.

मुंबई विरूद्ध लीनची फटकेबाजी-

अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा याने IPL 2020 स्पर्धेतून माघार घेतल्यावर मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनला संघात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती दिली. पण मलिंगा स्पर्धेतून बाहेर पडल्यावर ट्रेंट बोल्ट कुठे आहे? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला विचारण्यास चाहत्यांनी सुरूवात केली होती. त्यानंतर मुंबईने बोल्टदेखील ताफ्यात दाखल झाल्याची माहिती दिली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. गेल्या वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. पण या हंगामात दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्सशी ट्रेड केले आहे.