आयपीएलच्या तेराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने अखेरच्या सामन्यांत धडाकेबाज खेळ करुन इतर संघाचं गणित बिघडवण्याचं ठरवलेलं दिसतंय. दुबईच्या मैदानावर झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर ६ गडी राखून मात केली. चेन्नईच्या या विजयाचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला असून त्यांना प्ले-ऑफचं तिकीट मिळालं आहे. परंतू यामुळे चौथ्या स्थानावर पंजाब, राजस्थान, हैदराबाद, कोलकाता यांच्यातली शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे. चेन्नईकडून पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ऋतुराजने ७२ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी चेन्नईचा संघ सातत्याने खराब कामगिरी करत असताना धोनीने संघातील काही तरुणांमध्ये म्हणावा तसा स्पार्क दिसला नाही असं वक्तव्य केलं होतं. मात्र धोनीने तोपर्यंत किती खेळाडूंना संधी दिली असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी धोनीवर टीका केली होती. अखेरीस ऋतुराज गायकवाडने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत लागोपाठ अर्धशतक झळकावत आपल्यातला स्पार्क सिद्ध केला.

मधल्या षटकांत चेन्नईच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकत सामना कोलकाता नाईट रायडर्सला बहाल केला होता. परंतू अष्टपैलू रविंद्र जाडेजाने अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत लॉकी फर्ग्यसनच्या १९ व्या षटकांत फटकेबाजी करुन सामन्याचं चित्रच पालटलं. KKR ला आता प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांत विजय आणि इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.