News Flash

IPL 2020 : रंगतदार सामन्यात CSK ची KKR वर मात, ऋतुराज गायकवाड-जाडेजा चमकले

अखेरच्या षटकांत जाडेजाची महत्वपूर्ण फटकेबाजी

अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही KKR विरुद्ध सामन्यात विजय मिळवत चेन्नईने प्ले-ऑफची शर्यत अधिकच रंगतदार केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईचा संघ एका क्षणाला सामन्यात वरचढ होता. परंतू मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्यामुळे चेन्नई सामना हरणार असं वाटत होतं, परंतू रविंद्र जाडेजाने लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत सामन्याचं चित्रच पालटलं. कमलेश नागरकोटीच्या अखेरच्या षटकात जाडेजाने फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋतुराज गायकवाडने ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

१७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि शेन वॉटसन यांनी चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने RCB विरुद्ध सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. एकीकडे ऋतुराज चांगली फलंदाजी करत असताना शेन वॉटसन फॉर्मात दिसत नव्हता. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाल्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात वॉटसन बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि ऋतुराज यांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. महत्वाची गोष्ट म्हणजे या भागीदारीत रायुडूनेही फटकेबाजी करत ऋतुराजला चांगली साथ दिली. गायकवाड-रायुडू ही जोडी संघाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच पॅट कमिन्सने रायुडूला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.

यादरम्यान ऋतुराजने मैदानावर तळ ठोकत आपलं अर्धशतक साजरं केलं. दुसऱ्या विकेटसाठी त्याने रायुडूसोबत ६८ धावांची भागीदारीही केली. रायुडू २० चेंडूत ३८ धावा करुन बाद झाला आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी अवघी एक धाव काढून वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे एका क्षणाला सामना सहज जिंकेल असं वाटत असणारा चेन्नईचा संघ मोक्याच्या क्षणी केलेल्या आततायी फटक्यांमुळे संकटात सापडला. सामना हातातून निसटतोय असं वाटत असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ऋतुराजही माघारी परतला. पॅट कमिन्सने ७२ धावांवर त्याचा त्रिफळा उडवला. KKR कडून फर्ग्युसनने टाकलेलं १९ वं षटक संघाला चांगलंच महागात पडलं.

त्याआधी, आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून नितीश राणाने चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करत ८७ धावांची आक्रमक खेळी केली. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसेलेल्या कोलकात्याच्या फलंदाजांनी चेन्नईविरुद्ध सामन्यात चांगली सुरुवात केली. शुबमन गिल आणि नितीश राणा या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत पहिल्या षटकांमध्ये सामन्यावर KKR चं वर्चस्व राहील याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्ण शर्माने गिलला माघारी धाडत KKR ची जोडी फोडली. यानंतर KKR च्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही.

सुनिल नारायण, रिंकू सिंह हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. ज्या षटकांमध्ये कर्णदार मॉर्गनने फलंदाजीसाठी येणं अपेक्षित होतं तिकडे रिंकू सिंहला पाठवून KKR ने आणखी एक चूक केली. यामुळे महत्वाच्या षटकांमध्ये KKR चा संघ अपेक्षित धावगती राखू शकला नाही. नितीश राणाने एक बाजू सांभाळून घेत कर्णधार मॉर्गनसोबत भागीदारी करत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत नितीश राणाने ६१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ८७ धावा केल्या. लुन्गिसानी एन्गिडीच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकांमध्ये नितीश राणाही माघारी परतला. अखेरीस कर्णधार मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून एन्गिडीने २ तर सँटनर, जाडेजा, शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 9:07 pm

Web Title: ipl 2020 csk beat kkr by 6 wickets ruturaj gaikwad ravindra jadeja shines psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 विराटच्या जखमेवर मुंबई इंडियन्सने चोळलं मीठ ! भन्नाट कॅप्शन देत शेअर केला फोटो
2 IPL 2020 : तरुणांऐवजी वय झालेल्या अनुभवी खेळाडूंना संधी दिल्याचा CSK ला फटका !
3 IPL : CSK ने पुढच्या हंगामातही धोनीलाच कर्णधार ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको – गौतम गंभीर
Just Now!
X