महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आलं नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दिल्लीचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतू अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडलं आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू मधल्या षटकांत अपेक्षित धावगती राखण्याच हे फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे चेन्नईसमोरचं आव्हान अधिक बिकट झालं. फाफ डु-प्लेसिस आणि केदार जाधव माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, नॉर्टजेने २ तर अक्षर पटेलने १ बळी घेतला.

त्याआधी दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सला १७५ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एका क्षणाला मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना दिल्लीचा संघ मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांच्या जाळ्यात अकडला. मोक्याच्या क्षणी दोन विकेट गेल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची फारशी संधी दिली नाही.

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने आजच्या सामन्यासाठी एन्गिडीच्या जागी जोश हेजलवूडला संधी दिली. परंतू शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने यादरम्यान आपलं अर्धशतक साजरं केलं. ही जोडी दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने शिखर धवनला माघारी धाडत दिल्लीची जोडी फोडली. तो ३५ धावा काढून माघारी परतला. यानंतर अर्धशतकवीर पृथ्वी शॉही चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीने ६४ धावांची खेळी केली.

ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, परंतू मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. १९ व्या षटकाच्या अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर स्टॉयनिस आणि पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने दोन तर सॅम करनने एक बळी घेतला.

Live Blog

23:08 (IST)25 Sep 2020
अखेरच्या चेंडूवर रविंद्र जाडेजाही माघारी

चेन्नईचा सातवा गडी बाद, दिल्ली सामन्यात ४४ धावांनी विजयी

तेराव्या हंगामात चेन्नईचा सलग दुसरा विजय

23:02 (IST)25 Sep 2020
चेन्नईला सहावा धक्का

धोनी रबाडाच्या गोलंदाजीवर बाद

22:50 (IST)25 Sep 2020
चेन्नईला पाचवा धक्का

फाफ डु-प्लेसिस कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी

22:39 (IST)25 Sep 2020
केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस जोडी फुटली

नॉर्टजेच्या गोलंदाजीवर केदार जाधव पायचीत

महेंद्रसिंह धोनी मैदानात, चेन्नईच्या आशा धोनीवर

22:07 (IST)25 Sep 2020
चेन्नईला तिसरा धक्का, ऋतुराज गायकवाड माघारी

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गायकवाड धावबाद, चेन्नईचा संघ अडचणीत

21:51 (IST)25 Sep 2020
चेन्नईला दुसरा धक्का, मुरली विजय माघारी

नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विजय रबाडाकडे झेल देत माघारी, केल्या अवघ्या १० धावा

21:43 (IST)25 Sep 2020
चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन माघारी

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात वॉटसन १४ धावांवर माघारी

सीमारेषेवर हेटमायरने घेतला झेल

21:10 (IST)25 Sep 2020
पंत-स्टॉयनिस जोडीचा फटकेबाजीचा प्रयत्न

२० षटकांत दिल्लीची १७५ धावांपर्यंत मजल, चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान

21:01 (IST)25 Sep 2020
कर्णधार श्रेयस अय्यर मोक्याच्या क्षणी माघारी

१९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न

चेंडू बॅटची कड घेऊन धोनीच्या हातात, यष्टींमागे धोनीचा सुरेख झेल. सॅम करनने घेतला बळी

20:59 (IST)25 Sep 2020
कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतची महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी

परंतू धावगतीचा वेग वाढवण्यात दोन्ही फलंदाज अपयशी, दिल्लीच्या धावगतीला चेन्नईचा अंकुश

20:43 (IST)25 Sep 2020
दिल्लीचे दोन गडी माघारी, परंतू धावांचा ओघ ओसरला

चेन्नईच्या गोलंदाजांचं दिल्लीच्या फलंदाजांवर वर्चस्व

20:30 (IST)25 Sep 2020
दिल्लीला दुसरा धक्का, पृथ्वी शॉ माघारी

पियुष चावलाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी यष्टीचीत

दिल्लीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

20:20 (IST)25 Sep 2020
दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

पियुष चावलाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप करण्याच्या प्रयत्नात धवन पायचीत

२७ चेंडूत ३५ धावा काढून परतला माघारी, पहिल्या विकेटसाठी पृथ्वी-शिखरमध्ये ९४ धावांची भागीदारी

20:19 (IST)25 Sep 2020
सलामीवीर पृथ्वी शॉ चं अर्धशतक

चेन्नईच्या गोलंदाजांचा पृथ्वीकडून समाचार, शिखरचीही पृथ्वीला चांगली साथ

दिल्ली कॅपिटल्स सुस्थितीत

20:05 (IST)25 Sep 2020
शिखर धवन - पृथ्वी शॉ जोडीची धडाकेबाज सुरुवात

चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी केली अर्धशतकी भागीदारी

19:29 (IST)25 Sep 2020
जाणून घ्या दिल्लीच्या संघात कोणाला मिळालं स्थान
19:27 (IST)25 Sep 2020
असा आहे चेन्नईचा अंतिम ११ जणांचा संघ
19:26 (IST)25 Sep 2020
दिल्लीच्या संघातही दोन बदल

अमित मिश्रा आणि आवेश खान यांना संधी

19:25 (IST)25 Sep 2020
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

राजस्थानविरुद्ध पराभवानंतरही धोनीचा प्रथम गोलंदाजी करण्यावर विश्वास

संघात एक बदल जोश हेजलवूडला संघात स्थान, एन्गिडीला विश्रांती