IPL 2020 CSK vs RCB: बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुन्हा एकदा दयनीय अवस्था पाहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ९० धावांच्या जोरावर बंगळुरूने १६९ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत चेन्नईचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १३२ धावाच करू शकला. ख्रिस मॉरिसच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज निष्प्रभ ठरले. मॉरिसने १९ धावांत ३ बळी टिपत दमदार पुनरागमन केले.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंच २ धावांवर त्रिफळाचीत झाला. देवदत्त पडीकल आणि विराटने डाव सावरला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. पडीकल ३३ धावांवर माघारी गेल्यावर पाठोपाठ एबी डीव्हिलियर्सही शून्यावर बाद झाला. फलंदाजीत बढती मिळालेला वॉशिंग्टन सुंदर केवळ १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शिवम दुबे या जोडी डाव संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला. विराटने आपल्या IPL कारकिर्दीतील ३८ वे अर्धशतक ठोकलं. IPL इतिहासात तो सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी पोहोचला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ९० धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही त्याला साथ देत १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला. या दोघांच्या नाबाद ७६ धावांच्या भागीदारीच्या बळावरच बंगळुरूने ४ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने २, सॅम करनने १ आणि दीपक चहरने १ बळी टिपला.

VIDEO: विराट कोहलीचा दणका-

१७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. ‘इन-फॉर्म’ फाफ डु प्लेसिस ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर शेन वॉटसनदेखील १४ धावांवर तंबूत परतला. केदारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जगदीशनने अंबाती रायडूसोबत ६४ धावांची भागीदारी केली. पण धाव घेताना झालेला आळशीपणा त्याला नडला. जगदीशनने ३३ धावा केल्या. त्यानंतर चेन्नईच्या डावाला गळती लागली. कर्णधार धोनी (१०), सॅम करन (०), रविंद्र जाडेजा (७), ड्वेन ब्राव्हो (७) साऱ्यांनीच निराशा केली. बंगळुरूकडून दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या ख्रिस मॉरिसने १९ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले.

ख्रिस मॉरिसचा भेदक मारा-

दरम्यान, बंगळुरूच्या संघाने ६ पैकी ४ सामने जिंकत आपले स्पर्धेतील स्थान भक्कम केले आहे, तर चेन्नईचा हा ७ सामन्यांत पाचवा पराजय ठरला आहे.