राजस्थानविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे CSKला २० षटकांत ६ बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या. श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला. आपला २००वा सामना खेळणारा धोनी फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकला नाही. २८ चेंडूत त्याने केवळ २ चौकार लगावत २८ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर बाद झाला. शेन वॉटसनही ८ धावा काढून माघारी परतला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. चांगल्या लयीत असलेला रायडू (१३ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. १८व्या षटकात धोनी २८ धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजा (३५*) आणि केदार जाधव (४*) या दोघांनी संघाला २० षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयस गोपालने १४ धावांत १ बळी, राहुल तेवातियाने १८ धावांत १ बळी तर जोफ्रा आर्चरने २० धावांत १ बळी टिपत भेदक मारा केला.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रचला इतिहास…

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. या आधी कोणत्याही खेळाडूला हा पराक्रम करणं शक्य झालं नव्हतं. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १९७ सामन्यांसह मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर १९३ सामन्यांसह सुरेश रैना आहे.